Source: www.lokmat.com
Posted by: ID on 23-05-2016 03:14,
Type: Other , Zone: Central Railway)
पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वेवर दाखल होणार असल्याची गेली २ वर्षे चर्चा सुरू होती. चेन्नईतील रेल्वेच्या आयसीएफमध्ये बनलेली एसी लोकल मध्य रेल्वेवर एप्रिल महिन्यात दाखल झाली. या लोकलची १६ मेपासून ठाणे ते वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावर चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र ही चाचणी अद्यापही होऊ शकलेली नाही. या लोकलच्या सॉफ्टवेअरमध्ये समस्या असून, त्यात बदल करण्यात येत असल्यानेच मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी स्पष्ट केले होते.
एसी लोकलमधील इन्सुलेटर गेट बायपोलर ट्रान्झिस्टर (आयजीबीटी) स्वीचचे (पॉवर स्वीच) काम व्यवस्थित होत नसल्यानेच लोकलच्या चाचण्यांना ब्रेक लागला आहे. हा बिघाड दूर करण्यासाठी त्याचे सॉफ्टवेअर तयार केलेल्या कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार त्यांचे अभियंते मुंबईत दाखल झाले असून, एसी लोकलच्या सॉफ्टवेअरमधील बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.